आयएएस पुष्पराज खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगाव (प्रतिनिधी) – भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दीपस्तंभ मनोबलच्या जळगाव, पुणे आणि दिल्ली केंद्रांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण दीपस्तंभचे माजी विद्यार्थी व नुकतेच यूपीएससी २०२४ मध्ये यश संपादन केलेले आयएएस पुष्पराज खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. शाम महाजन व डॉ. रेखा महाजन, कुणाल महाजन (इंजिनिअर उद्योजक व दीपस्तंभ अमेरिका सचिव), नेहा महाजन (गुगल), जितेंद्र शहा (उद्योजक, अहमदाबाद), परेश शहा (संचालक) आणि दीपस्तंभचे संस्थापक यजूवेंद्र महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दृष्टिहीन विद्यार्थीनी नाजनीन शेख व समीक्षा माकोडे यांच्या देशभक्तीपर गीताने झाली. सर्व मान्यवरांचे स्वागत दीपस्तंभच्या सहकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविकात यजूरवेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. किरण चौरे व समीक्षा माकोडे यांच्या गायनाने वातावरण भारावून गेले. तत्पश्चात माजी विद्यार्थी आयएएस पुष्पराज खोत यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विविध शासकीय परीक्षांत यश मिळवलेल्या १६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये विनोद महारनवर, संजना बेलेकर, मयूर गायकवाड, कैलास जाधव, वैभव पईतवार, पूजा खरात, प्रवीण गायकवाड, अंकिता चोपडे, पुष्पावती पवार, योगिता पावरा, शिवम तलारे, सत्यम सोनवणे, आकाश घाटे, किशोर वैष्णव, ऋषिकेश दिवटे आणि नेहा गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी संस्थेतील “एम्प्लॉयी ऑफ द मंथ” हा पुरस्कार जाहीर करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक सादरीकरणांनी झाला. पुणे केंद्रातील कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून ईयरबूक कॅनवस या कंपनीच्या सीईओ सुरश्री रहाणे उपस्थित होत्या. स्वतःच्या शारीरिक अडचणींवर मात करून उभा केलेला त्यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली मनोबल केंद्रात पहिल्याच वर्षी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. “वंदे मातरम्”च्या घोषात झालेल्या ध्वजारोहणानंतर देशभक्तिपर गाणी, नृत्य, भाषणे आणि कवितांच्या सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचारीवर्गातही विशेष उत्साह दिसून आला. तिन्ही केंद्रांतील सोहळ्यांतून एकच संदेश उमटला – “समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाच्या मूल्यांवर उभं राहिलेलं भारतमातेचं स्वप्नच आपला खरा अभिमान आहे.”