जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव
जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रामपंचायती व शासकीय विभागांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आ. सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील आदर्श कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, ग्रामपंचायतींचा, महिला बचतगटांचा व पोलिस दलाचा स्वातंत्र्यदिनानिमित्त गौरव करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, हा सन्मान म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शेतकरी, महिला, अधिकारी आणि पोलिस यांच्या कार्यक्षमतेचा गौरव आहे. “शेतकरी अन्नदाते आहेत, अधिकारी योजना राबवतात, महिला बचतगट समाज उभा करतात, पोलिस कायदा-सुव्यवस्था टिकवतात आणि ग्रामपंचायती विकासाची दिशा दाखवतात. म्हणूनच स्वातंत्र्याचा खरा अर्थ एकत्र येऊन गाव-शहराच्या प्रगतीत आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, बालिका पंचायत, जलतारा, अमृत आहार, सौरऊर्जा, स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांनी जिल्हा आदर्श ठरत आहे. या कामामागील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायती व महिला बचतगट हेच जिल्ह्याचे खरे हिरो आहेत. शहीद जवानांचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे स्वातंत्र्याची खरी रक्षा आहे. सैनिक, शेतकरी आणि समाजसेवकांच्या बलिदानाचे देणे प्रत्येक नागरिक मानतो.”
जिल्ह्यातील ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पोलीस सेवा, जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, महिला बचतगट, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे आणि रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जलतारा योजना, अमृत आहार योजना, आयएसओ मानांकन, स्वच्छता अभियान, वेद उपक्रम, सौर गाव योजना यांसारख्या उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. महिला बचतगटांनी आर्थिक सबलीकरण, स्वयंरोजगार आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल पारितोषिके मिळवली. शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा, नागरिकांशी प्रभावी संवाद, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि निवडणूक प्रक्रियेत योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा, कायदा-सुव्यवस्था राखण्यात विशेष योगदान, अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणि गुन्हे उकल केल्याबद्दल सन्मानपत्रे देण्यात आली. तसेच सामाजिक क्षेत्रात अवयवदान, तंबाखूमुक्ती अभियान, वृक्षसंवर्धन, तसेच शिक्षण क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
बालिका पंचायत ही नावीन्यपूर्ण योजना
बालिका पंचायत ही जळगाव जिल्ह्यात एक नावीन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली असून त्या संदर्भातील एक सुंदर माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. या कामाची सुरुवात झालेल्या ग्रामपंचायतीचा गौरव यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पुरस्कार विजेते, मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्यात त्यांनी सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांची, योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन पाटील, अपूर्वा वाणी आणि सरीता खाचणे यांनी केले.