चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील रांजणगाव येथील गोदामातून सुमारे ९३ हजार रूपयांचा गुटख्याचा साठा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव येथील संशयित विजय प्रभाकर भंडारी याच्या किराणा दुकानाला लागून असलेल्या गोदामात गुटख्याचा साठा केलेला आहे, अशी माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, एएसआय युवराज नाईक, हवालदार संदीप पाटील, विजय पाटील यांच्या पथकाने या गोदामावर छापा टाकून सुमारे ९३ हजार ११२ रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. याप्रकरणी शिपाई विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून विजय भंडारी याच्याविरूद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.