रामानंदनगर पोलिसांची एम.जे. कॉलेज परिसरात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अवैधपणे सुरू असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’वर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून कॅफेमध्ये गैरकृत्ये करणाऱ्या ७ मुले-मुलींवर धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. पोलिसांनी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जामनेर येथील एका कॅफेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला शहरातील कॅफेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तपासणीदरम्यान पोलिसांना रामानंद नगर परिसरातील एम. जे. कॉलेज परिसरात विठ्ठल मंदिर चौकात असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’बद्दल माहिती मिळाली. हा कॅफे एका गाळ्यामध्ये सुरू होता आणि त्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार करून पडदे लावलेले होते.(केसीएन)या अंधाऱ्या जागेचा वापर शाळकरी आणि कॉलेजमधील मुला-मुलींना गैरकृत्ये करण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ कॅफेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, कॅफेमध्ये ३x३ फूट लांबी-रुंदीचे प्लायवूडचे छोटे-छोटे कप्पे आणि त्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावलेले आढळून आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे ठेवलेले होते. छाप्यात एकूण सात जोडपी गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज दिली.
पोलिसांनी कॅफेची तपासणी केली असता, तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कोणतेही साहित्य (जसे की कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी) आढळून आले नाही. तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी, अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद ता. जामनेर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२९, १३१ (अ) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(केसीएन)ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी जळगाव विभाग संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सचिन रणशेवरे यांच्यासह पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि स्वाती पाटील आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहवा जितेंद्र राठोड करत आहेत.