जामनेर तालुक्यात फत्तेपूर येथील घटनेचा एलसीबीकडून उलगडा
जळगाव (प्रतिनिधी) :- फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देउळगाव गुजरी येथील हरीओम अलंकार या सोन्याच्या दुकानातून ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणाला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचे मध्यप्रदेशातील दोन साथीदार फरार आहेत.
फिर्यादी चेतन नंदकिशोर विसपुते (वय २६, रा. कापडगल्ली, जामनेर) यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी फत्तेपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला आणि चेतन विसपुते यांचे लक्ष विचलित करून ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास केला आणि तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला (विधी संघर्षग्रस्त बालक) निष्पन्न करून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने मध्य प्रदेशातील आपल्या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. फत्तेपूर पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि. शरद बागल, श्रेणी पोउपनि. रविंद्र नरवाडे, पोहेकाँ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक पोकॉ महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.