चाळीसगावच्या नागरिकांमध्ये आनंदाची लहर
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आमदार मंगेश चव्हाण हे सन २०१९ पासून कोविड काळ वगळता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य भाविकांना दरवर्षी स्वखर्चाने पांडुरंगाचे दर्शन घडवत असतात. गेल्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी २० हजारावर अधिक भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले. अभिमानाची बाब म्हणजे सन २०२५ च्या पंढरीच्या वारी सोहळ्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे चारधाम म्हणजेच पंढरपूर, आमदार चव्हाण यांनी सन २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी ‘भक्ती ज्येष्ठांची… वारी पंढरीची’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत भाविकांना प्रवासात मोफत प्रवास, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, नास्ता, औषधी तसेच पंढरपूर या ठिकाणी चहा, जेवण, नाश्ता, निवासाची सोय केली जाते. सुरुवातीचा उपक्रम हा लक्झरी बसने त्यानंतर विशेष रेल्वेने या वारकरी भाविकांना पांडुरंगाचे दर्शन लाभले आहे. चाळीसगाव शहरात पाच वर्षांपूर्वी हरिनामाचा झेंडा रोवला व हजारो ज्येष्ठांना पंढरपुरात नेऊन विठ्ठलाचे घडवलेले दर्शन याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेतली आणि एकादशी वारी २०२५ मध्ये नोंद झाली. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.