जळगावच्या मयत महिलेच्या कुटुंबियांना दिलासा
जळगाव (प्रतिनिधी) :- रेल्वे अपघातात मृत महिलेच्या कुटुंबीयांना ८ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश नागपूर येथील रेल्वे कोर्टाने दिल्याने जळगाव येथील एका कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भारत सरकारकडून ८ लाख रुपये नुकसान भरपाई आणि ३,६०,००० रुपये व्याजासह देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ही घटना २३ एप्रिल २०१९ रोजी घडली होती. जळगावमधील रहिवासी फहेमुदाबी नियाज अलिशाह या गोवा एक्स्प्रेसने मनमाडला जात असताना गाडीला प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे झालेल्या लोटालोटीत फहेमुदाबी यांचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चालत्या रेल्वेतून खाली पडल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सुरुवातीच्या चौकशीत, रेल्वे प्रशासनाने फहेमुदाबी यांच्यावरच निष्काळजीपणाचा आरोप ठेवला होता आणि नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. त्यांनी म्हटले होते की, प्रवाशांनी रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला.
त्यानंतर, फहेमुदाबी यांचे पती शहनियाज अलिशाह अमीर शाह यांनी नागपूर येथील रेल्वे क्लेम ट्रिब्युनल कोर्टात याचिका दाखल केली. अर्जदारांच्या वतीने वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी आणि ॲड. सुमेषा ऋतू बोरकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टात सांगितले की, रेल्वे प्रशासनाने प्रवासी संख्येपेक्षा जास्त तिकिटे विकल्यामुळे गाडीत प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीमुळे फहेमुदाबी यांचा तोल जाऊन अपघात झाला. त्यामुळे या अपघातासाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे.
कोर्टाने अर्जदारांच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य केला आणि रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले. कोर्टाच्या न्यायाधीश आर. सत्यभामा यांनी भारत सरकारला फहेमुदाबी यांच्या कुटुंबीयांना एकूण ११ लाख ६० हजार रुपये (८ लाख भरपाई + ३.६० लाख व्याज) देण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.