रामानंद नगर पोलिसांची अवघ्या १२ तासांत कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कोल्हे नगर परिसरात गावठी कट्ट्यातून गोळीबार करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला १५ हजार रुपयांचा सिल्वर रंगाचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
कोल्हे नगर परिसरात घटना दिनांक ७ऑगस्ट रोजी रात्री घडली. फिर्यादी सरला राजदीप सपकाळे यांच्या घरात दिपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या सराईताने गावठी कट्ट्यातून फायर केला. फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिसांनी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता.(केसीएन)मात्र, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे रामेश्वर कॉलनी परिसरात काटेकोर सापळा रचून आरोपीला पकडण्यात यश आले. अटकेनंतर न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी मिळवण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला १५ हजार रुपयांचा सिल्वर रंगाचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.दिपक तरटे हा पोलिसांच्या रडारवर आधीपासूनच होता. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे नोंद आहेत.(केसीएन)ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका सुधाकर अंभारे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, योगेश बारी, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील यांनी यांनी कारवाई केली.