एरंडोल शहरात महादेव मंदिर परिसरात घटना
एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील खोल महादेव मंदिर परिसरात एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ६ रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अतुल अशोक सुतार (वय ३४) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते परिवारासह राहत होते. त्यांनी त्यांच्या घरातील मागच्या खोलीत लोखंडी सळईला दोराने बुधवारी दुपारी गळफास लावून घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. किरण सुतार यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला खबर दिली. अतुल याने गळफास घेतल्याचे दिसताच पत्नी भारती हिने आक्रोश केला. शेजारच्या नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.
तेथे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अतुल सुतार यांच्या आत्महत्येमुळे एरंडोल येथे शोककळा पसरली आहे.