एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- चारचाकी वाहनातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ७० वर्षीय वृद्धाचे २५,००० रुपये लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
कालींका माता मंदिरासमोरून दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास एक वृद्ध पायी जात असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना वाहनात बसवून चौकात सोडतो असे सांगितले. मागची सीट खराब असल्याचे कारण देत त्यांनी वृद्धाला पुढील सीटवर दाटीवाटीने बसवले. काही अंतर गेल्यावर त्यांनी वृद्धाला खाली उतरवले.(केसीएन)खाली उतरल्यावर आपल्या खिशातून २५,००० रुपये चोरीला गेल्याचे लक्षात येताच वृद्धाने तातडीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कामाला लावले. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत जळगाव येथील गेंदालाल मिल परिसरात सापळा रचला. तेथे त्यांना संशयित आरोपी अर्शद शेख रज्जाक शेख (वय ३२) आणि अताउर रेहमान मोहम्मद शकील (वय ३५) यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची २५,००० रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे २,००,००० रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उप अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.