पावसाची संततधार धरण भरण्यासाठी महत्वाची
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- गिरणा धरणात पावसाची आवक सध्या दररोज वाढतांना दिसत आहे. आज शनिवारी दि. २ ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गिरणा धरणात आतापर्यंत एकुण ६५ टक्के जलसाठा साठलेला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गिरणा धरणात पावसाळा सुरु होण्यापूर्वी साधारण २१ टक्के जलसाठा शिल्लक होता. आता पावसाळ्याला सुरवात झाल्यापासून आतापर्यंत नाशिक व जळगाव जिल्हयात पाऊस जोरात बरसणे सुरु झाले आहे. त्यामुळे गिरणा धरणात पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. शनिवारी दि. २ रोजी गिरणा धरणात पावसाच्या पाण्याची आता एकुण ४४ टक्के वाढ झालेली आहे. गिरणा धरणात आतापर्यंत एकुण ६५ टक्के जलसाठा साठलेला आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. गिरणा धरण भरत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाऊस नियमित राहिला तर पुढील आठवड्यात जलसाठा ८० टक्क्यांवर जाईल अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे.