मुंबई (वृत्तसंस्था) – करोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आयोगाने परीक्षेची तारीख आज जाहीर केली. ‘यूपीएससी’ची पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर, तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यांसह अन्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली. लॉकडाऊनचा परिणाम आयोगाच्या विविध परीक्षांवरही झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मे 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2 जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली होती.
दरम्यान, परीक्षांचे नवे वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.