चाळीसगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – जुन्या नगरपालिका इमारतीमधील तलाठी कार्यालयासमोर, एका तलाठ्याला शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर जुनी नोंद कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी तलाठी महिला मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिच्यासह दोन साथीदारांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (धुळे) यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांच्या इतर सात भावंडांच्या नावे असलेल्या वडीलोपार्जित शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. याबाबत मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (वय २९, तलाठी, तहसील कार्यालय, चाळीसगाव) यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अर्ज जमा करून घेतला, परंतु त्याची पोचपावती दिली नाही.
यानंतर तलाठी मोमीन दिलशादने तक्रारदारांना सांगितले की, “तुमचे काम खूप मोठे आहे. मी तुमच्या गावातील वाडीलाल पवार याच्याशी बोलून त्याला पैशांबद्दल सांगते, तुम्ही त्यांना भेटून घ्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे त्यांच्याकडे दिल्यावर मी तुमचे काम करून देते, त्याशिवाय तुमचे काम होणार नाही.” अशी माहिती तक्रारदारांनी ३ जुलै २०२५ रोजी एसीबीला दिली होती.
या तक्रारीची ३ जुलै २०२५ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तलाठी मोमीन दिलशादने तक्रारदारास वाडीलाल पवार (वय ४०, रोजगार सेवक, रा. लॉजे) यांस भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी वाडीलाल पवार यांच्यासह मोमीन दिलशाद यांची भेट घेतली असता, मोमीन दिलशादने कामासाठी पैसे लागतील असे सूचित केले. त्यानंतर, १४ जुलै रोजी पुन्हा भेट घेतल्यावर मोमीन दिलशादने वाडीलाल पवार यांच्याशी बोलून उद्या सांगते असे सांगितले. अखेर, १७ जुलै रोजी वाडीलाल पवार यांनी मोमीन यांनी २५ हजार रुपये लाच मागितल्याचे सांगितले. यावेळी दादा बाबू जाधव (वय ४०, रा. लोंजे) याने लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहित केले.
त्यानुसार, दिनांक ३० जुलै रोजी दुपारी ३:२० वाजता चाळीसगाव येथील जुन्या नगरपालिका इमारतीमधील तलाठी कार्यालयासमोर लाचेची रक्कम २५ हजार रुपये स्वीकारताना तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे हे करत आहेत.