हिम्मत असेल तर पोलिसांनी लोढाविषयी पत्रपरिषद घेऊन माहिती द्यावी : आ. खडसेंचे आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या अनेक महिन्यांपासून खडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी षडयंत्र सुरु आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी जणूबुजून डॉ. प्रांजल खेवलकर यांना विनाकारण बदनाम करून गोवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून येत आहे. कारवाईमधील फोटो, विडिओ सार्वजनिक करण्याची तत्परता दाखविणारे पुणे पोलीस हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत लोंढाविषयी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती का देत नाहीए असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( श.प.) गटाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
आ. एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, घरामध्ये पाच-सात जण बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावं लागेल काय ? कारण मुळामध्ये पोलिसांना विचारायचं आहे कि, रेव्ह पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव्ह पार्टी सांगून बदनाम करण्याचे प्रयोजन काय ? कारवाईमध्ये मीडियाच्या माध्यमातून जगासमोर जे फोटो व व्हिडीओ आले, याबाबत पोलिसांना कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ सगळेसमोर दाखवावे ? पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार आहे काय ? असा सवाल खडसेंनी केला आहे. या संदर्भामध्ये डॉ. प्रांजल खेवलकर यांना पहिला नंबरचा आरोपी करण्याचे कारण काय ? त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्याचा पोलीसांचा प्रयत्न का आहे ?
डॉ. खेवलकर यांच्यावर एकही गुन्हा नाही. हे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही. एक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेले नाव आहे. अमली पदार्थ जो सापडला, २.७ ग्रॅम तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे. हे आपल्याला त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून दाखविलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग तिला पहिला क्रमांकाचे आरोपी करायला हवे होते आणि इतरांना साक्षीदार करायला पाहिजे होते मात्र तसे झालेले नाही. एकनाथ खडसेंना व त्यांच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी केलेले हे कृत्य आहे. अल्कोहोलचा रिपोर्ट गोपनीय असतो. तो मीडियात आला कसा असेही सवाल आ. खडसेंनी केले आहे.