नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मॉस्को, सायबेरियामधील उर्जा प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर तेल गळती झाल्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी या भागात आणीबाणीची घोषणा केली आहे. या उर्जा प्रकल्पामधून तब्बल 20 हजार टन डिझेलची गळती झाली असून हे डिझेल जलमार्गात पसरले आहे.
मॉस्कोच्या ईशान्य दिशेला 2,900 किलोमीटर (1,800 मैल) अंतरावरील नॉरिलस्क शहराच्या बाह्य विभागातील विद्युत केंद्रात शुक्रवारी ही गळती झाली. पाण्यातून वाहणारे इंधन रोखण्यासाठी अंबरनया नदीत बूम लावण्यात आले आहेत. नदीचा प्रवाह एका तलावात पोहोचतो आहे. या तलावातूनच आणखी एका नदीचा उगम होतो. प्रवाहाचा हा भाग पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा आर्क्टिक महासागराकडे जातो.
गळतीचे परिणाम कमीत कमी राखावेत असे आदेश पुतीन यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. परंतु मासे आणि इतर सागरी जीवांचे 1 अब्ज रूबलपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते, असे ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’चे रशियातील समन्वयक अलेक्सी निझ्निकोव्ह म्हणाले.
अपघात झालेला उर्जा प्रकल्प निरिल्स्क निकेलच्या शाखेमार्फत चालवला जातो. या अपघाताचे कोणतेही कारण निश्चितपणे समजू शकलेले नाही, परंतु पर्माफ्रॉस्टच्या माथ्यावर मातीवर बांधल्या जाणाऱ्या बांधकामांचीही काळजी कंपनीला आहे. कारण तेलामुळे ही भुसभुशीत मागी पाण्यात बुडू शकते, असे कंपनीच्या एका निवेदनात म्हटले आहे.







