पत्रपरिषदेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात : माझ्या विकासकामांची मोठी यादी, तुमची आहे तरी किती ?
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर येथील भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याला अटक झालेली आहे. हिम्मत असेल त्याची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल. मात्र मंत्र्यांची नावे बाहेर येतील म्हणून लोढांच्या नार्को टेस्टची आमची मागणी सत्ताधारी पक्ष मनावर घेत नाही. तसेच, माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत शंका घेतात तर मंत्री गिरीश महाजन यांनी हिम्मत असेल तर माझ्या मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करून दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) गटाचे विधानपरिषदेचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना शनिवारी दि. २६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे.
कथित ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात जामनेर येथील भाजप कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबई व पुण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि आ. एकनाथराव खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप काही दिवसांपासून सुरु आहे. त्यात शुक्रवारी दि. २५ रोजी जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदारांनी पत्रकार परिषदेत आ. खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना पुरावे ठेऊन आरोप करावे असे भाजपच्या आमदारांनी आ. खडसेंना आवाहन केले होते. त्यात शनिवारी दि. २६ रोजी आ. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आमदारांनी केलेले आरोप खोडून मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान दिले आहे.
प्रफुल्ल लोढाप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी नार्को टेस्ट करावी. सरकार तुमचेच आहे. तुम्हाला ते शक्य आहे. त्यातून खरे सत्य बाहेर येईल. मात्र सत्ताधारी हे करणार नाही. कारण त्यात मंत्र्यांचीच नावे बाहेर येतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील विधानसभेत गिरीश महाजन यांना चिडविताना, “अंकल… अंकल…अंकल काकीला सांगेन आ… मग किती काकी आहेत, ते आपल्याला बघावं लागेल” अशी उपरोधिक टोलेबाजी केली आहे. गिरीश महाजन यांच्याबद्दल साऱ्यांनाच माहिती आहे. माझा मुलगा निखिल खडसेच्या मृत्यूबाबत शंका गिरीश महाजन उपस्थित करतात. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी सीबीआय चौकशी करावी, असेही खडसे म्हणाले.
माझ्या संपत्तीविषयी महाजन हे प्रश्न उपस्थित करतात. मात्र एका शिक्षकाचा मुलगा, त्यांच्या पेन्शनवर जगणारा माणूस, या गिरीश महाजन यांचे उत्पन्न आहे तरी काय ? असा सवाल उपस्थित करत आ. खडसे यांनी, भारतीय जनता पक्षाबाबत मी कधीही गैर बोललेलो नाही असे सांगितले. तर माझ्या काळात मी जिल्ह्यात अनेक धरणे आणली. शैक्षणिक संस्था उभारल्या. अनेक विकासकामे केली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात कोणती विकासाची गंगा जिल्ह्यात आणली त्यांनी सांगावे असेही सांगितले. पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा हा गैरवर्तनी आहे असे भाजप आमदारांचे म्हणणे असेल तर मग त्याला महाजनांनी पक्षप्रवेश का दिला असे विचारत, गिरीश महाजन यांनी खोटे गुन्हे दाखल करून माझ्या जावईला विनाकारण तुरुंगात टाकल्याची खंत व्यक्त केली. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, दिलीप खोडपे, संग्राम सूर्यवंशी, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदी उपस्थित होते.