जळगाव (प्रतिनिधी) :- क्रोध, पाप हे विषारी आहे. विषाची घृणा केली जाते. ज्याच्यात क्रोध आहे त्याची घृणा केली जाते. ही बाब स्पष्ट करताना हरिकेशीमुनींचे उदाहरण प्रस्तूत करण्यात आले. चांडाळ कुलात जन्मलेल्या हरिकेशीमुनींनी स्वतःमधील क्रोध संपविला. क्रोधमुक्त जीवन आत्मोन्नतीचे साधन असते याचे महत्त्व त्यांना समजले. त्यांना वर्तमान, भविष्य काळाचे ज्ञान झाले व स्वतःमध्ये सुधारणा करून संयम मार्ग अनुसरून दीक्षा घेतली. आपण देखील आपल्यातला क्रोध संपवावा व आत्मोन्नतीरत व्हावे असा मोलाचा संदेश श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी धर्मसभेत दिला. श्रावकास ‘जैन दर्शन’मध्ये नमूद – जीव, अजीव, पुण्य, पाप, आश्रव, संवर, निर्जरा, बंध और मोक्ष या ९ तत्त्वांचे नाम व माहिती प्रत्येकाला असायला हवी. हे तत्त्व ध्यानात ठेवण्यासाठी एक प्रतिकात्मक कथा देखील प. पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितली.
धर्मश्रवण, श्रद्धाशील, पुण्यार्जन, पौषध, सामायिक, प्रतिक्रमण, कायोत्सर्ग अशा श्रावकाच्या सात कर्तव्यांविषयी माहिती देण्यात आली. पती पत्नी पर्यटनास निघाले. नदी पार करण्यासाठी ते नावेत बसले. वातावरण सर्व ठीक होते. पतीपत्नी नावेतून नदी पर्यटनासाठी जातात. पती-पत्नी ‘जीव’ तर नाव ‘अजीव’ होय. जोपर्यंत त्यांचा ‘पुण्य’ काळ होता तोवर सर्व ठीक होते. ‘पाप’ काळ उदय झाल्यावर नाव डगमगायला लागली, त्यातच नावेला छित्र पडले ते ‘आश्रव’, नदिचे पाणी नावेत येऊ लागले म्हणजे त्यातील पती हा ते नावेचे छित्र बंद करतो ते म्हणजे ‘संवर’ ‘निर्जरा’ नावेत आलेले पाणी दोन्ही हातांनी बाहेर टाकतो, जोवर पती-पत्नी नावेत असतात ते असते ‘बंध’ नदी ओलांडून आपल्या घरी सुखरूप जातात ते म्हणजे ‘मोक्ष’ अशा नऊ तत्त्वांचा सार सहज शब्दात सांगण्यात आला.
कर्मवाद समजावून सांगताना आत्मा आणि कर्म यांचा संबंध डोळ्याने दिसत नसतो. शुभ नामकर्म आणि अशूभ नामकर्म अशा दोन संकल्पना समजावून सांगितल्या. शुभ नाम कर्म हे सहज, सरळ आणि समजपूर्वक केले जाते ते शुभ असते, या विरुद्ध अशुभ कर्माचे म्हणता येईल. कपट, लोभ, माया, धोका, फसवणूक करणे इत्यादी अशुभ नाम कर्म असल्याचे प्रतिक आहे, त्यापासून दूर राहिलेले बरे, असेही प. पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.