चोपडा ग्रामीण पोलिसांना मोठे यश, तपासात धक्कादायक बाबी उघड
जळगाव (प्रतिनिधी):- चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र आणि दारूगोळ्याच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पारउमर्टी (जि. बडवाणी, मध्य प्रदेश) येथील शिकलकर समाजाकडून होणाऱ्या अवैध शस्त्रनिर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या विशेष नाकाबंदी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर, आणि पोलीस उपअधीक्षक (चोपडा उपविभाग) आण्णासाहेब घोलप यांच्या निर्देशानुसार उमर्टी आणि सत्रासेन परिसरात २४ तास नाकाबंदी सुरू होती. याच नाकाबंदीदरम्यान ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. बुधवार, दि. २३ जुलै रोजी सत्रासेन नाका येथे नाकाबंदी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक रावसाहेब एकनाथ पाटील आणि पोलीस नाईक घनश्याम हिम्मत पाटील यांना उमर्टी नाक्याकडून सत्रासेनच्या दिशेने एक दुचाकी वेगात येताना दिसली. त्यांनी तात्काळ बॅरिकेड लावले. दुचाकीचालकाने दुचाकी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस नाईक रावसाहेब पाटील यांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले. यावेळी तो दुचाकीसह खाली पडला.
दुचाकी चालवणाऱ्या मंथन मोहन गायकवाड (वय २२, मूळ रा. वडाळा, ता. बार्शी, जि. सोलापूर, ह. मु. हडपसर, पुणे) याच्याजवळ ३ अग्निशस्त्र आणि ६ जिवंत काडतुसे आढळली. तसेच, मागे बसलेल्या स्वप्निल विभीषण कोकाटे (वय ३२, मूळ रा. रुई, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्या ताब्यातून १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळाली.(केसीएन)पोलीस नाईक रावसाहेब पाटील यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंके, पोलीस नाईक चेतन महाजन, पोलीस नाईक विशाल पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचानाम्याद्वारे ही पिस्तूले आणि काडतुसे जप्त केली.
अटक करण्यात आलेल्या मंथन मोहन गायकवाड आणि स्वप्निल विभीषण कोकाटे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार आप्पासाहेब गायकवाड (रा. गोजवड, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि कानिफनाथ बहिरट (दोघे रा. बावा पेट्रोल पंप जवळ, संभाजीनगर) हे धुळे येथे थांबले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी धुळे येथे जाऊन त्यांचा शोध घेतला, परंतु ते मिळाले नाहीत.(केसीएन)या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ बहिरट याच्या मित्राची दुचाकी धुळे येथून घेऊन त्यांनी उमर्टी येथून पिस्तूल आणण्यास मदत केली होती, तर हे दोघे स्वतः चारचाकी वाहन घेऊन धुळ्याकडे धावले होते. अटक आरोपी हे पिस्तूल घेऊन फरार आरोपींना चारचाकी गाडीतून सुरक्षित वाहतूक करण्यासाठी देणार होते. तसेच, त्यांनी सांगितले की उमर्टी येथील शिकलकर समाजाच्या ‘पाजी’ नावाच्या व्यक्तीने त्यांना ही अग्निशस्त्रे आणि काडतुसे ५० हजार रुपयांना विकली होती. विशेष म्हणजे, आरोपी मंथन गायकवाड याच्यावर यापूर्वीही अग्निशस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. चोपडा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.