कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन वेधले लक्ष
एरंडोल ( प्रतिनिधी ) – एरंडोल शहरातील रहिवासी मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झाले आहेत. वीज वापरामध्ये कोणतीही वाढ नसतानाही, घरगुती वीज बिलांमध्ये अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात, शहरातील नागरिकांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, एरंडोल विभाग यांना वाढीव बिलांबाबत तक्रार करत ती कमी करण्याची विनंती केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, एरंडोलकरांना येत असलेली वाढीव बिलांची समस्या सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार टाकत आहे. वेळेवर बिल भरूनही अशा प्रकारे अवाजवी रक्कम येणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या वाढीव बिलांसंदर्भात नागरिकांनी महावितरणकड प्रमुख मागण्या केल्या आहेत. अवाजवी वाढीव आलेल्या वीज बिलांची तपासणी करून ती रक्कम वाजवी दरात कमी करावी.
संबंधित मीटरची फेरतपासणी करण्यात यावी. ग्राहकांसाठी सुलभ बिल दुरुस्ती प्रक्रिया त्वरित सुरू करावी. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करून या संदर्भात तात्काळ लेखी उत्तर देण्यात यावे. या निवेदनावर शहरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत, जे या समस्येने त्रस्त आहेत. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास, नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर नागरिकांच्या सह्या आहेत.