चोपडा तालुक्यात गलंगीपासून शहरापर्यंत घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा तालुक्यात गोपनीय माहितीवरून गांजासह २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल २ तरुणांचा पाठलाग करून ताब्यात घेतला आहे. यामुळे गांजाची विक्री उघडकीस आली आहे.
जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि वाढते सेवन रोखण्यासाठी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विशेष सूचना दिल्या होत्या.(केसीएन)दि. २० जुलै रोजी रात्री ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा रवींद्र अभिमन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटरसायकलवरून गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे बेकायदेशीरपणे गांजासदृश अंमली पदार्थाची वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील आणि दीपक माळी यांनी गलंगी गावात पाळत ठेवली.
आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी चोपडा शहराकडे वेगाने पलायन केले. पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवी पाटील आणि दीपक माळी यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींचा वेग जास्त असल्याने पोलीस पथकाने ही माहिती पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांना दिली. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी विलेश सोनवणे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोपडा शहरात नाकाबंदी लावली. आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकलवर मागे बसलेला इसम उडी मारून पळून गेला. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी सुमारे १५० ते २०० मीटर धावत त्याचा पाठलाग करून त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले.
या कारवाईत ९० हजार रुपये किंमतीची एक बजाज पल्सर काळ्या रंगाची (एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५) मोटरसायकल, १,२१,९५०/- रुपये किंमतीचा ८.१३० कि.ग्रॅ. वजनाचा गांजा आणि ५१,०००/- रुपये किंमतीचे ०२ मोबाईल असा एकूण २,६२,९५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.(केसीएन)चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन करत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे (चोपडा शहर पोलीस स्टेशन), पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवी पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, चालक दीपक चौधरी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव), पोकॉ मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे (चोपडा शहर पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
संशयित आरोपींची नावे उदयभान संजय पाटील (वय २१ वर्ष, रा.चांग्या निमजवळ,अडावद) व योगेश रामचंद्र महाजन (वय २१ वर्ष, रा.खालचा माळीवाडा, अडावद) अशी आहेत.