जळगाव शहरातील घटना, लाखांचा मुद्देमाल लांबविला
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महामार्गावर असलेल्या गोदावरी आय. एम. आर. कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून प्रशासकीय अधिकारी मयुर हेमराज पाटील यांच्या कक्षासह अकाउंट विभागातून १ लाख ५०० रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे एन.व्ही.आर. असा एकूण १ लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी मयुर पाटील यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शनिवारी दि. १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मयुर पाटील घरी असताना, कॉलेजमध्ये चोरी झाल्याचे समजले. मयुर पाटील यांनी तात्काळ कॉलेजला जाऊन पाहणी केली असता, अकाउंट विभागातील लेखापालाच्या काउंटरवरील कपाटात ठेवलेली विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन फीची रोख रक्कम १ लाख रूपये गायब असल्याचे निदर्शनास आले. तसेच, कार्यालयातील फाईल्स व इतर दस्तऐवज फेकलेले, कपाटे व काउंटर वाकवून नुकसान केलेले आणि सीसीटीव्ही स्टोरेजचे हाईव्हिजन कंपनीचे एन.व्ही.आर. गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.