जळगाव तालुक्यातील नशिराबाद पुलावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद गावाजवळील टोल नाक्याजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला आहे. शिरसाळा येथील प्रसिद्ध मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसह निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
हर्षल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता. धरणगाव) असे आहे. हर्षल पाटील हा वराड येथे आई-वडील व बहिणीसोबत राहत होता.(केसीएन)शनिवारी दि. १९ रोजी पहाटे तो गावातील ८ ते १० मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाला होता.
नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षल हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने घटनेनंतर घरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.