चोपडा ग्रामीण पोलिसांची वनविभागाच्या मदतीने कारवाई
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी आणणाऱ्या दोन जणांवर चोपडा ग्रामीण पोलीसांनी वन विभागाच्या मदतीने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून मांस व दोन शिंगे जप्त करण्यात आले असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोकॉ राकेश पाटील आणि गजानन पाटील यांना गोपनीय माहितीनुसार दुचाकी क्रमांक (एमपी १० एनसी ४८५७) वरून वांगऱ्या बारेला (रा. टाक्यापाणी, वरला) आणि त्याचा साथीदार वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेली माहिती वन्यप्राण्यांच्या तस्करी संदर्भात असल्याने, तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, फॉरेस्ट कंपार्टमेंट बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सफौ राजु महाजन, पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ गजानन पाटील, पोकॉ विनोद पवार, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ सुनिल कोळी, तसेच वनविभागाचे विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी.आर. बारेला, वनरक्षक बानू बारेला आणि वनरक्षक योगेश सोनवणे यांच्या पथकाने बुधवार, १७ जुलै दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली.
त्यावेळी दुचाकीने जात असलेल्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी चौकशीत आरोपींनी त्यांची नावे वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५ दोन्ही राहणार मध्य प्रदेश) अशी सांगितली. त्यांच्याजवळ हरणाचे दोन शिंगे आणि मांस मिळून आले. ते पोलीसांनी जप्त केले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.