नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जेरुसलेम, जगातील फारच कमी देशांमध्ये करोनाच्या फैलावाला नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. यामध्ये इस्राईलचाही समावेश होतो आहे. मात्र, अगदी अलीकडच्या काळात इस्राईलमधील करोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होताना आढळून आली आहे. गेल्या 24 तासांत इस्राईलमध्ये 116 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका महिन्यातील रुग्णांच्या संख्येपेक्षाही ही संख्या अधिक आहे. यापूर्वी 1 मे रोजी इस्राईलमध्ये 155 रुग्ण आढळले होते.
आता इस्राईलमध्ये नव्याने वाढत असलेल्या रुग्णांमध्ये शाळकरी मुले आणि शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. शाळांमध्ये करोनाचा फैलाव होणे हे अतिशय चिंताजनक मानले जात आहे. या फैलावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी 40 पेक्षा अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सुमारे 7 हजार विद्यार्थी आणि शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जेरुसलेममधील जिम्नॅशियम हायस्कूलमध्ये करोनाचा फैलाव सर्वाधिक झाला आहे. या शाळेतील 130 विद्यार्थी आणि काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शाळांमधील संसर्ग वाढण्याबरोबर इस्राईलमधील संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याचे लक्षात आले आहे. इस्राईलमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासूनच लॉकडाऊन जाहीर केला गेला होता. काटेकोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन शिथिल करायला सुरुवात झाली होती.
त्यानंतर शाळा, कॉलेज, कार्यालये, सागरी किनारे, दुकाने आणि रेस्टॉरंटलाही उघडण्यात आले होते. इस्राईलमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या 17,342 इतकी झाली आहे. तर 290 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनाची बाधा झालेले 15 हजार जण बरे झाले आहेत.