अमळनेर पोलिसांची जळोद फाट्यावर केली कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- अमळनेर पोलिसांनी मंगळवारी दि. १५ जुलै रात्री १०.३० वाजता केलेल्या कारवाईत ३ लाख रुपये किमतीचा १५ किलो गांजा जप्त करत दोघांना अटक केली आहे. जळोद गावाकडून अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवले. या माहितीच्या आधारे, पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता जळोद गावाकडून येणाऱ्या फाट्याजवळ सापळा रचला. त्यावेळी (एमएच १९, सीटी ४८४५) क्रमांकाच्या दुचाकीवरून येणाऱ्या दोन संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या एका गोणीमध्ये १५ किलो प्रतिबंधित गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.
पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता, त्यांनी महेश कैलास पाटील (वय-३१, रा. भडगाव) आणि नितीन शरद गौंड (वय-१९, रा. पाचोरा) अशी सांगितली. या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, त्यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, पोलीस हवालदार संतोष नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, उज्वलकुमार म्हस्के, हर्षल पाटील, योगेश बागुल, समाधान सोनवणे, सुनिल पाटील आणि होमगार्ड पूनम हटकर यांनी केली.