भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरीचा भडगाव पोलीसांनी छडा लावला असून या गुन्ह्यात पोलीसांनी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु.) इंडसइंड बँक लिमिटेड, भारत फायनान्स कंपनीत फिल्ड असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून दुचाकीने पथराड येथून गोंडगावहून चाळीसगाव येथील कार्यालयात येत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बजाज प्लॅटिना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी त्याला शिवीगाळ करत त्याच्या वाहनाला लाथ मारली.
त्यामुळे विक्की पाटील खाली पडले. चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून रस्त्याच्या बाजूला फेकली आणि त्यांच्या पाठीला अडकवलेली बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत ५८ हजार ४०० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि ॲक्सेस कंपनीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण ६५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. हा सर्व मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणानंतर हा गुन्हा पथराड गावातील काही तरुणांनी केल्याची माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित गोपाल संजय पारधी (वय ३२, रा. पथराड, ता. भडगाव) याला १२ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याने कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची नावे मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, आणि कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) अशी सांगितली. पोलिसांनी दि. १३ जुलै रोजी मयूर साळुंखेला अटक केली. त्यानंतर १४ जुलै रोजी अतुल नाना पाटील आणि कैलास वाल्मिक पाटील यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.