यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि. १५ जुलैच्या पहाटे घडली. यावल पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
प्रदीप घनश्याम महाजन (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रदीप महाजन यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. प्रदीप हे आपल्या नेहमीच्या कामानुसार मोहराळे ता. यावल या गावाच्या शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.(केसीएन) पहाटेच्या सुमारास विहिरीजवळ काम करत असताना अचानक पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. विहिरीत पाणी भरलेले असल्याने प्रदीप यांचा त्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना इतक्या वेगाने घडली की कुणाला काही कळण्याआधीच त्यांचा श्वास घेणे थांबले. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले.
त्यानंतर प्रदीप यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यावल पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम छगन महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी करीत आहेत.