चाळीसगाव शहरातील घटना, चौघांना बसला फटका
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील युनियन बँकेच्या एटीएममधून ५ ग्राहकांचा एटीएम कोड वापरून किंवा अन्य मार्गाने त्यांच्या खात्यातून सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भाऊराव पाटील (रा. तरवाडेपेठ, ता. चाळीसगाव) यांनी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजता भडगाव रोडवरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अन्य बँकेचे एटीएम कार्ड हे मशीनमध्ये अडकले. कार्ड निघत नव्हते. त्यावेळी एटीएमच्या बाजूला अनोळखी इसम उभा होता. त्याने मशीनवर चिकटवलेल्या चिठ्ठीवरील क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर पलीकडून इसमाने बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी केली. आणि एटीएम कार्ड नंतर काढून देण्याचे सांगितले. सायंकाळी ७ वाजता ते पुन्हा तेथे आले. त्यावेळी असाच प्रकार घडला.
ज्ञानेश्वर मधुकर पवार रा. टाकळी प्र.चा. यांच्या खात्यातून ४२ हजार १० रूपये, संभाजी पतिंगराव पाटील रा. टाकळी प्र.चा. यांच्या खात्यातून ३० हजार रूपये, गणेश रविंद्र पाटील रा. म्हाळसा पिंपळगाव ता. चाळीसगाव यांच्या खात्यातून १७ हजार रूपये तर नितेश अशोक पाटील रा. टाकळी प्र.चा. यांच्या खात्यातून ५ हजार रुपये खात्यावरुन काढले गेल्याचे समोर आले. संभाजी पाटील यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावर त्यांच्या खात्यातून एटीएम अडकल्यानंतर १ लाख १३ हजार रुपये काढले गेल्याचे समोर आले. त्यावर बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी मशीन उघडले आणि त्यात कुणाचेही एटीएम कार्ड अडकले नसल्याचे स्पष्ट केले. पुढील तपास पो.नि. अमितकुमार मनेळ हे करीत आहेत.