मूलभूत सुविधांसाठी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन
जळगाव ( प्रतिनिधी ) : – दत्तनगर, उमापती महादेव मंदिर, जुना खेडी रोड परिसरात रस्ते, गटारींसह विविध मुलभूत सुविधा महानगरपालिकेकडून पुरविल्या जात नसल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांनी सोमवारी मनपावर मोर्चा काढला़ तसेच तातडीने रस्ते व गटारी तयार करण्यात याव्यात, अशी मागणी लावून धरत मोर्चेकऱ्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले़ तब्बल दीड ते दोन तास हे आंदोलन सुरु होते़. यावेळी आयुक्तांनी सध्या मुरूम टाकून रस्ते दुरुस्त करू त्यानंतर ईस्टीमेट तयार करून पक्के रस्ते तयार करण्यात येतील अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
धनाजी नाना चौधरी महाविद्यालय परिसरातील दत्तनगर, उमापती महादेव मंदिर जुना खेडी रोड भागातील गट नं़७५,७६,७७,७८ मधील कॉलन्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून रस्ते, गटारी, पथदिवे या सारख्या मुलभूत सुविधा महापालिकेकडून पुरविण्यात येत नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते नसल्यामुळे रहिवाश्यांना घरी येणे व घरून कामाच्या ठिकाणी जातांना खूप कसरत करावी लागत आहे़ या कॉलन्यांमध्ये रस्तेच नसल्याने पुर्णपणे चिखल झालेला असून गटारी नसल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यांवर येत आहे़.
त्यामुळे दररोज वाहने घसरून अपघात होत असल्याने नागरिकांना गंभिर दुखापत होत आहेत. त्यामुळे संतप्त महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढत मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत रस्ते, गटारी तयार करण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा रहिवाश्यांनी घेतला होता. यावेळी आंदोलकांकडून मनपा प्रशासनाविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्याप्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
मोर्चेकऱ्यांनी आधी महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांची भेट घेवून समस्यांचा पाढा वाचला, परंतु योगेश बोरोले यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांवर रहिवाश्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेण्यासाठी तेराव्या मजल्यावरील आयुक्तांचे दालन गाठले. मात्र, आयुक्तांनी ठरावीक लोकांनी विषय मांडायला मध्ये यावे, असे सांगितल्याने महिलांनी सर्वांना आमचा विषय मांडायचा आहे, अशी भूमिका घेतली.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे यांच्यासह दिनेश भारंबे, संजय खडके, मोहन चौधरी, बाळू पाटील, कैलास भावसार, मंगला तळवदे, रविंद्र पाटील, जगदीश नेहते, मोनिका देशमुख, गायत्री पाटील, सुनिता पाटील, उत्तरा खाचणे, भगवान बारी, लिलाधर बोंडे, छाया नेवे, सुनिता कोळी, कल्पना चौधरी, देवयानी जावळे यांच्यासह परिसरातील रहिवाश्यांच्या स्वाक्ष-या आहेत.