खड्डेमय रस्त्यांमुळे उपोषणाचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) :- महानगरपालिकेला निवेदन देऊन पाच दिवस उलटले तरी शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “हे वर्षही चिखलातच जाणार की काय?” अशी भीती नागरिकांना सतावत असून, जर लवकरच दखल घेतली नाही, तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मदतीने महानगरपालिकेबाहेर उपोषण करण्याचा इशारा जळगाव महानगराध्यक्ष निलेश बाविस्कर आणि परिसरातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका जवळ आल्या की राजकीय कार्यकर्ते मतांसाठी येतात, मात्र मूलभूत सोयीसुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. रस्त्यांची आणि गटारींची दुरुस्ती न झाल्यास आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा तसेच घरपट्टीही न भरण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. नीळकंठेश्वर महादेव मंदिर, श्री दत्त कॉलनी परिसरातील रस्ते तर अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा प्रचंड त्रास होत आहे.
रस्त्यावरील तीन फूट खोल खड्ड्यांमध्ये वाहने फसत आहेत, बंद पडत आहेत आणि अनेकदा लहान मुले व ज्येष्ठ नागरिक पडत असल्याचीही माहिती मिळत आहे. एका घटनेत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गाडी मुख्य रस्त्यावरील पाण्यात बंद पडल्याने नागरिकांचे हाल समोर आले आहेत. गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, महानगरपालिकेने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, उपोषणाच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.