पारोळा तालुक्यातील टोळी येथे एल्गार
पारोळा ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील टोळी येथील महिलांनी गावातील अवैध दारूविक्री विरोधात एकत्र येत ग्रामपंचायतीकडे ठरावाची मागणी केली. महिलांच्या या निर्धाराला ग्रामपंचायतीकडूनही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उद्यापासून गावात १०० टक्के दारूबंदी लागू करण्यात येणार असल्याचे सरपंच बापूराव पाटील यांनी जाहीर केले.
ग्रामपंचायतीच्या आवारात पार पडलेल्या या आंदोलनात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी गावात दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या आणि आर्थिक नुकसानीबाबत आपली व्यथा मांडली.’दारूमुळे आमची घरं उद्ध्वस्त होत आहेत. आता सहनशक्ती संपली आहे,’ अशा शब्दात महिलांनी भावना व्यक्त केल्या. या मागणीवर तत्काळ प्रतिसाद देत सरपंच बापूराव पाटील, पोलिस पाटील नलिनी पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा प्रवीण पाटील आणि संतोष आबा पाटील यांनी गावात उद्यापासून दारूबंदी जाहीर केली. तसेच, येणाऱ्या आठ दिवसांत विशेष ग्रामसभा घेऊन अधिकृत ठराव करण्यात येईल,’ असे सरपंचांनी स्पष्ट केले.
दारूबंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी हवालदार हितेश चिंचोले यांच्याकडे सहकार्याची मागणी करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही यासंदर्भात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. टोळी गावात महिलांनी उचललेला हा पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.