जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
यावल ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्याच्या जवळ बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्या होत्या. गुरुवारी घडलेल्या या घटने प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी वर आलेल्या दोघांचा शोध पोलीस घेत आहे. तर घटनास्थळी रात्रीच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक हे पाहण्यासाठी दाखल झाले होते. तर शुक्रवारी डीवायएसपी यांनी पोलीस निरीक्षकांसह धानोरा किनगावसह मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व पाहणी केली तर या घटनेतील जखमी हॉटेल मालकाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
चिंचोली ता. यावल येथे आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. या हॉटेलवर गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी वर दोन जण आले होते. त्यापैकी एक जण दुचाकी खाली उतरून हॉटेल बंद करून कारद्वारे किनगाव कडे निघत असलेले हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर वय ४० रा.पुनगाव ता. चोपडा, हल्ली मुक्काम चंदू अण्णा नगर जळगाव, हे त्यांच्या कार क्रमांक (एम.एच. १९ सी.एफ. ३३५३) मध्ये होते व त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र रतन रमेश वानखेडे वय ४२ रा.किनगाव खुर्द हे होते. तेव्हा दुचाकीच्या खाली उतरून त्यांच्या कारजवळ एक अनोळखी तरुण आला व त्याने सांगितले की मला बियर पाहिजे आहे. त्याला सांगितले की हॉटेल बंद आहे. तुला जर बियर पाहिजे असेल तर किनगाव येथे जा. तेव्हा अशा बोलण्याच्या रागातून त्या अनोळखी इसमाने आपल्याजवळून एक पिस्तोल काढले आणि प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
एक त्याच्या छातीत लागली तर एक त्याच्या उजव्या खांद्याजवळ लागली आणि गोळी झाडून दोघेही किनगावच्या दिशेने दुचाकीद्वारे फरार झाले. जखमी अवस्थेत बाविस्कर यांना जळगावला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. व त्यांनी पाहणी केली होती व दवाखान्यात जाऊन देखील या जखमी हॉटेल मालकाची त्यांनी पाहणी केली तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रतन वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी डिवायएसपी अण्णासाहेब घोलप, पोलीस अधीक्षक रंगनाथ धारबळे यांनी धानोरा तसेच किनगाव येथील मुख्य राज्य मार्गावर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आहे. आरोपीच्या शोधाच्या दृष्टिकोनातून सदर सीसीटीव्ही फुटेज उपयोगी पडणार आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.