रावेर तालुक्यात चिनावल येथे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान : गुन्हा दाखल
रावेर ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील चिनावल येथील कोचूर रोडला लागून जुन्या सावदा रस्त्यावरील खेमा कामा पाटील यांच्या शेतात नवीन लागवड केलेली केळीची ३,५०० खोडे अज्ञात व्यक्तींनी एकाच रात्रीत कापून फेकली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकाराची माहिती चिनावल व परिसरात समजताच शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. खेमा कामा पाटील यांनी नुकतीच मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून केळीचे बेणे, ठिबक सिंचन व आंतरमशागतसाठी खर्च केले होते. मात्र, गुरुवारी रात्री अज्ञातांनी संपूर्ण ३,५०० केळीची खोडे अक्षरशः कापून फेकून दिले. या प्रकाराबाबत शेतकऱ्याने सावदा पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे. घटनास्थळी सावदा सपोनि विशाल पाटील, पीएसआय सानप, हे. कॉ. विनोद पाटील, मजहर तडवी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिनावल तलाठी मंडळ अधीकारी अमोल चौधरी यांनी तहसीलदारांनाही माहिती देऊन या नुकसानीस कारणीभूत असलेल्या अज्ञात व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.