जळगाव शहरात एलसीबीची कारवाई, १९ लाखांहून अधिक रक्कम जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील प्रतिष्ठित ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १३ मोबाईल हँडसेटसह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे.यामुळे खळबळ उडाली आहे.
गुरूवारी १० जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.(केसीएन)त्यानुसार, त्यांनी पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर पाटील आणि पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांचा समावेश असलेले पथक तयार केले. दि. ११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून रोख १९ लाख ९७ हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात संशयित पप्पु सोहम जैन (रा. बळीराम पेठ), भावेश पंजोमल मंधान (वय-३७, रा. रामाराम नगर,सिंधी कॉलनी), मदन सुंदरदास लुल्ला (वय ४२, रा. गणपती नगर), सुनील करलाल वालेचा (वय-४०, रा. सिंधी कॉलनी), अमित राजकुमार वालेचा (वय-४५, रा. गणेश नगर),(केसीएन)विशाल दयानंद नाथानी (वय ४८,रा. गायत्री नगर), आणि कमलेश कैलाशजी सोनी (वय-३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड) जळगाव यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.