जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. १० जुलैला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऋषिकेश समाधान खाटीक (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आजोबांसोबत राहून शिक्षण घेत होता. फर्दापूर येथे त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. सैन्यात भरती होण्याचे ऋषिकेश याचे स्वप्न होते अन् त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता. (केसीएन)दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ऋषिकेश हा आजोबा पांडुरंग गोविंदा खाटीक यांच्या शेतात फवारणीसाठी गेला होता. हौद भरताना ऋषिकेशचा तोल गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, तो न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता विहिरीजवळ सायकल व ऋषिकेशच्या चपला दिसल्या. त्यानंतर विहिरीत पाहिले असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळला. तर त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. पहूर गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.