पुणे (वृत्तसंस्था) – जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यातील वडज, येणेरे, बेलसर, पारुंडे, काले, निरगुडे तसेच आपटाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या बागा आहेत.
शेतकऱ्याने वर्षभर जोपासलेले हे हुकमी फळ नेमके बाजारात विक्री करता पाठविण्याच्या हंगामातच गळून पडले आहे. मुंबई बाजारात तसेच परदेशात मोठी मागणी असलेल्या या जुन्नर हापूसचे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील हा जुन्नरचा हापूस मुंबई बाजारात साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होत असतो. या आंब्याना विशेषतः आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते.