जळगाव शहर पोलीस स्टेशनसह एलसीबीची घटनास्थळी चौकशी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट येथील चौथ्या मजल्यावर सोने कारागिरांच्या दुकानात मंगळवारी दि. ८ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शस्त्रांच्या साहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांने आरडाओरडा केल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. एका सीसीटीव्हीत चोरटे येताना व जाताना दिसत आहेत.
गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर अशोककुमार अंबालाल सोनी (वय ५६, रा. पटेल नगर, जळगाव) यांचे सोन्याची कारागिरी करण्याचे दुकान आहे. या दुकानात १५ ते १८ कामगार काम करीत असतात. मंगळवारी दि. ८ जुलै रोजी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी तीन संशयित इसम आले. त्यांच्या हातात धारदार शस्त्र व बंदूक असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. सुरुवातीला सुरक्षारक्षकाला बंदूक दाखवून “चिल्लाना नही” म्हणून २ जणांनी दम भरला व त्याला धरून ठेवले. तर तिसरा दुकानात शिरून त्याने जतीन महादेव माझी नावाच्या कारागिराला शस्त्र दाखवून खाली बसण्यास सांगितले. तर इतर ६ ते ७ कामगार मागील खोलीत लपून बसले.
यावेळी सुरक्षारक्षकाने आरडाओरडा केला. तेव्हा घाबरून तिन्ही चोरटयांनी तेथून पळ काढला. मात्र धावपळीत एकाची चप्पल मात्र पायातून निसटून तेथेच पडली. तर हे तिघे मार्केटमधील घटनास्थळाखालील तिसऱ्या मजल्यावरील अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याची प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. मात्र लांबवर असलेल्या एका प्रसाधनगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेरात हे तोंड झाकून आलेलं तरुण येताना व जाताना दिसत आहे. सुरुवातीला जळगाव शहर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. मात्र ठोस हाती लागले नाही. रात्री एलसीबीचे पीएसआय शरद बागल व सहकार्यांनी घटनास्थळी पाहणी करीत माहिती जाणून घेतली. तसेच काही सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.