पंढरपूर येथे घडली घटना, तिघांचे कौतुक
भुसावळ ( प्रतिनिधी ) : – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूरातील चंद्रभागा नदीत शेगाव येथील दिंडीतील १५ वर्षीय वारकरी मुलगी नदीत स्नान करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात आल्याने बुडू लागली. यावेळी वरणगावच्या तिघा तरुणांनी धाडस दाखवत या मुलीचे प्राण वाचवले.
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत शेगाव येथील दिंडीतील १५ वर्षीय वारकरी मुलगी नदीत स्नान करत होती. अचानक ही मुलगी नदीच्या पाण्यात बुडू लागली. हे दिसताच वरणगाव येथील प्रकाश रामचंद्र कोळी, पंढरी गंगाराम कोळी आणि कृष्ण सुरेश वाढे या तिघा तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसाने पाण्यात उडी घेतली. तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. या वेळी या तिघांनी दाखवलेले शौर्य आणि संवेदनशीलता संपूर्ण वारीतील वारकरी आणि उपस्थित भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली. या तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









