प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांचे मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- रोग, वृद्धत्व आणि मृत्यू हे जीवनातील तीन अटळ सत्य आहेत, ज्यांना कोणीही टाळू शकत नाही. या तीन शत्रूंपासून सावध राहण्यासाठी आपला विवेक सतत जागृत ठेवावा, झोपू नये, असा मोलाचा संदेश प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात दिला. अन्नाच्या प्रत्येक कणाचा, वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा, गुरूंच्या वचनांचा आणि हितचिंतक मित्राच्या मनाचा प्रत्येकाने नेहमी आदर करावा, असे मौलिक विचार प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.
इंद्रिय, वस्तू, जीव-अजीव यांचा कधीही अनादर करू नये. तसे केल्यास पुढील जन्मी त्यापासून वंचित राहावे लागते असे प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितले. अन्नाच्या कणाचा आदर कसा करावा, याविषयी श्रीकृष्ण वासुदेव व दुर्वास ऋषी यांची प्रेरक कथा सांगितली. श्रीकृष्णाने दुर्वास ऋषींना गरम खीर दिली, ज्यामुळे ऋषींचे तोंड पोळले. संतप्त होऊन दुर्वास ऋषी शाप देणार होते, परंतु श्रीकृष्णाने तात्काळ माफी मागितली. पण प्रायश्चित्त म्हणून ऋषींनी श्रीकृष्णाला गरम खीरचे शरीराला लेपण करण्यास सांगितले. श्रीकृष्णाने अन्नाचा अवमान होऊ नये म्हणून तळपायांना खीर लावणे टाळले. ज्या ठिकाणी खीर लावली गेली, त्या ठिकाणी त्यांचे शरीर वज्रदेही बनेल, असे वरदान श्रीकृष्णाला मिळाले. वेळेचा सदुपयोग कसा करावा, याचे गणित ही मांडून दाखवले. पहिले गुरु माता-पिता असतात त्यांचा आदर करावा तसेच आपल्या भल्याचा जे विचार करतात ते मित्र म्हटले जातात. त्यांच्या मनाचाही आदर अवश्य करावा असे आवाहन करण्यात आले.
प्रत्येक व्यक्ती, मग ती लहान असो वा वृद्ध, गर्भात असतानाच रोग, वृद्धत्व आणि मृत्यू हे तीन शत्रू सोबत येतात. यापासून कोणीही सुटका करू शकत नाही. हे सत्य स्पष्ट करताना प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी राजा श्रेणीक आणि अनाथी मुनी यांचे उदाहरण दिले. अनाथी मुनी डोळ्यांच्या व्याधीमुळे संयमाच्या मार्गावर कसे आले, याबाबत त्यांनी रंजक कथा सांगितली. बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धापकाळ या अवस्थेतून माणसाला जावे लागते. मृत्यू हे तर अंतिम सत्य आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञान, सेवासुविधा मिळतात परंतु मृत्यू कुणाही टाळू शकले नाही. १० जुलैपासून चातुर्मास पर्व सुरू होत आहे. या काळात प्रत्येकाने धर्म कार्यात सहभागी होऊन आत्म्याचा उत्कर्ष साधावा, असे आवाहनही प्रवचनात केले गेले.