जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील फुपनगरी गावात मंगळवारी दि. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश राजाराम सोनवणे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि वडील असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी शोभा सोनवणे शेतात कामाला गेल्या होत्या, तर मोठा मुलगा महेश जळगावला गेला होता. घरात मुकेश एकटेच होते. घरात कोणीही नसताना मुकेश सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. (केसीएन)सकाळी ११ वाजता, मुकेश सोनवणे यांचा लहान मुलगा विशाल दहावीचा क्लास आटोपून घरी परतला.
घराचे दार उघडताच त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांचा मृतदेह दिसला. त्याच्या किंकाळ्या ऐकून शेजारी आणि परिसरातील लोक धावले, घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मुकेश सोनवणे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.