जळगाव शहरात लक्ष्मी नगर येथे तरुणाच्या आत्महत्येने हळहळ
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कानळदा रोडवर असणाऱ्या लक्ष्मी नगर येथे एका तरुणाने राहत्या घरी कोणी नसताना सकाळी आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दि. ८ जुलै रोजी समोर आली आहे. त्याची आई पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन घरी परतली, तेव्हा ही घटना समोर आली. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
सचिन उर्फ रामेश्वर लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मी नगर, कानळदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आईसह राहत होता. शहरातील केळकर मार्केट येथे एका कपड्यांच्या दुकानात काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन)दरम्यान त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आई आणि तो असे दोनच राहत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त सचिनची आई ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली होती. तर सचिन घरीच होता.
मंगळवार दि. ८ जुलै रोजी सकाळी सचिनची आई मंगलाबाई या पंढरपूर येथून घरी जळगाव येथे परतल्या. घरी आल्यावर त्यांनी दरवाजा उघडताच समोर त्यांच्या मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या वेळेला त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)मंगलाबाईंचा आक्रोश ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. सचिनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळेला सचिनच्या कुटुंबीयांसह मित्रांनी रुग्णालयात आक्रोश केला. घटनेमुळे लक्ष्मी नगर परिसरात शोककळा पसरली आहे. तर जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.