अमळनेरच्या प्रांताधिकारी मुंडावरे यांची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील शिरुडनाका परिसरातील शिवाजीनगर भागातील गुन्हेगार कात्या उर्फ प्रमोद गौरव महाले याला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
कात्या उर्फ प्रमोद याच्यावर चोरी, दरोडा, जीवे मारण्याची धमकी देऊन लूटमार, जबरी लूट यासारखे सहा गुन्हे दाखल असून न्यायप्रविष्ट आहेत. त्याची शहरात दहशत असून तो एका खटल्यात न्यायालयात हजर देखील न झाल्याने जामीनाच्या अटी शर्तींचा भंग झाला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. डीवायएसपीनी तो प्रस्ताव चौकशी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला. यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजू ऐकून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी कात्या उर्फ प्रमोद महाले याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.