जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) च्या पथकाने नवीन बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तीन जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून इंडिका कार, ५ मोबाईल, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २५ जून रोजी पोलीस हवालदार प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना जळगाव बसस्थानकात अमरावती येथील रेकॉर्डवरील खिसेकापू गुन्हेगार आल्याचे समजले. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हवालदार अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे यांच्या पथकाला बसस्थानक परिसरात गस्त घालण्याचे निर्देश दिले.
गस्त घालत असताना, या पथकाला तीन संशयित व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या इराद्याने फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले.(केसीएन)चौकशीदरम्यान त्यांनी अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती) आणि अजहर हुसेन जफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजिद समोर, रहमत नगर, अमरावती) अशी नावे त्यांनी सांगितली. कठोर चौकशीअंती त्यांनी दि. २४ जून रोजी दुपारी जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातून १०० रुपयांच्या दोन नोटांची बंडले चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींची अंगझडती आणि त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यांच्याकडून ३३,८३० रुपये रोख रक्कम, १७,५०० किमतीचे ५ मोबाईल फोन, एक रेक्झीन बॅग आणि ₹५ लाख किमतीची एक टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण ₹५,५१,५३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आरोपी अहमद बेग कादर बेग याच्याविरुद्ध अमरावती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही ४ गुन्हे दाखल आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच, कोणताही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ डायल ११२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस अधीक्षक महोदयांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त घालण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.(केसीएन) हि कारवाई संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हवालदार सुनील दामोदरे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे यांनी यशस्वीपणे पार पाडली.