जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असताना त्यावरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि. २२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारामधील शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास भिकाजी महाजन (५२, रा. गणेशवाडी, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. त्यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. गणेशवाडी परिसरात त्यांचे टेन्ट हाऊस दुकान आहे.(केसीएन)कैलास महाजन यांचे शिरसोली शिवारात शेत आहे. रविवारी ते शेतातील एका खांबाजवळ शिडी लावून काम करीत होते. त्यावेळी शिडीवरून ते खाली पडले व त्यांच्या बरगड्यांना मार लागला.
त्यांना ग्रामस्थांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बराच वेळ ते व्यवस्थित बोलतही होते. मात्र नंतर अचानक प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात व शिरसोली गावात शोककळा पसरली आहे.