चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे कारवाई
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वैजापूर येथील न्यू लक्ष्मी कृषी केंद्रावर जिल्हास्तरीय भरारी पथकाने गुरुवारी दि. १९ रोजी धाड टाकून ७ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा खते व बियाण्यांचा साठा जप्त केला. यात ४०५ गोण्या रासायनिक खत, मका व कापसाचे २ लाख ८३ हजार ४१८ रुपयांची १८८ पाकिटे जप्त करण्यात आले.
वैजापूर येथील न्यू लक्ष्मी कृषी केंद्राचे संचालक योगिराज देवसिंग पाटील (वय ३०, रा. नागलवाडी ता. चोपड़ा) हे २५ मे २०२५ पासून विनापरवाना बियाणे व रासायनिक खते विक्री करीत असल्याचे आढळून आले. कृषी केंद्रात विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले ४ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचे सुमारे २० टन रासायनिक खत, मका व कापसाचे २ लाख ८३ हजार ४१८ रुपयांची १८८ पाकिटे जप्त करण्यात आले.
याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित योगिराज पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला अहे. कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार, कृषी अधिकारी किरण पाटील, मंडल कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.