वेतन न झाल्याने कर्मचारी वैतागले
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील घंटागाडीचालक, हेल्पर व झाडू कामगारांचा मे महिन्याचा पगार न झाल्यामुळे कामगारांनी मंगळवारी दि. १७ जून रोजी काम बंद आंदोलन केल्यामुळे शहरात मंगळवारी कचरा संकलन झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई मक्तेदाराला ३ लाख ६० हजारांचा आर्थिक दंड बजाविला आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील साफसफाईचा मक्ता नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. गेल्या ७ वर्षांपासून शहरातील कचरा संकलन व स्वच्छतेचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून करण्यात येत आहे. शहरातील घंटागाडीचालक, हेल्पर व झाडू कामगारांचा मे महिन्याचा पगार न झाल्यामुळे सर्व कामगारांनी मंगळवारी १७ जून रोजी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरात मंगळवारी कचरा संकलन झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई मक्तेदाराला ३ लाख ६० हजारांचा आर्थिक दंड बजाविला आहे. नवीन मक्तेदार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, दोन मक्तेदारांनी आपणच पात्र आहोत असा दावा केला असून मक्ता मिळविण्यासाठी दोघांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून या याचिकेवर कामकाज न झाल्यामुळे नवीन मक्तेदाराला कार्यादेश देण्याचे रखडले आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी होऊ नये म्हणून वॉटरग्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे. मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने शहरातील २० घंटागाड्या या कचरा संकलनासाठी फिरल्या नाही. त्यामुळे घराघरांतून निघणारा कचरा संकलन तसेच उघड्यावर पडलेला कचरा आता महापालिकेसमोर आव्हान ठरला आहे.