पुणे (वृत्तसंस्था) – वेल्हे तालुक्यात करोनाच्या महासंकटानंतर चक्री वादळाने उग्र रूप धारण करून अनेकांचे संसार उघड्यावर आणले. वेल्हे तालुका हा डोंगराळ व जंगली भाग असल्याने पावसाचे प्रमाण २५०० ते २७०० मि.मि पर्जन्यमानाची नोंद होत असते. जून ते आॅक्टोंबर या कालावधीत जास्त पाऊस होत असतो. बुधवार (दि.४)चक्री वादळाने तालुक्यात धडक मारली आणि अनेकांच्या घरांचे छप्पर, शाळेचे छत, वीजेचे खांब, झाडे, पिके जमिनदोस्त करूनच शांत झाला. चक्री वादळाच्या कहरानंतरची शांतता पाहीली तर वेल्हेकरांचे संसार उघड्यावर आणून स्मशान शांतता वादळाने पसरवलेली होती.

पुण्यालगत असणारा वेल्हे तालुका हा नेहमी आपत्तीच्या बाबतीत चर्चेत राहीला आहे.मोठ मोठी संकटे वेल्हे तालुक्यांनी पेलली आहेत.अतिमागास म्हणून ओळख असणाऱ्या वेल्हे तालुक्याला वेगवेगळ्या आपत्तींना नेहमीच तोंड द्यावे लागत आहे.वेल्हे प्रशासन सर्वोत्परी प्रयत्न करून आपत्तीला सामोरे जात आहे. वेल्हे भागात मालवली येथील घरावर विजेचा खांब पडल्याने शुभांगी जाधव किरकोळ जखमी झाल्या. अंत्रोली, निवी, चक्री वादळाने काहींच्या घरावरचे छप्पर हिरावले आहे. तर काहींच्या घरावर वीजेचे खांब,शाळेचे छत उडवून धूमाकुळ घातली. शेतकऱ्यांच्या आंब्यांचे व इतर पिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. वादळ वाऱ्यांने पीके, झाडे कोलमडून पडली.

पानशेत परिसरात धनगरवाड्या उघड्यावर पडल्या.धनगर बांधवांची घरे केंबळाची आणि कुडा,मेडीची असल्याने चक्री वादळां समोर तग धरू शकली नाहीत.कागदा सारख्या घरांवरचे छप्पर वादळाने फेकले गेले. वडघरमधील धनगर वाड्यावरचे (गोपाळ वाडा) कोंडीबा मरगळे, नागु मरगळे,नागु डोईफोडे यांच्या घरांची छप्पर उडाल्याने सगळी रात्र घरातील पोरांबाळासह पावसाचा,वाऱ्याचा मारा शोसत उघड्यावरच काढली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. साठवलेल्या धान्याची नासाडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
शिरकोली येथील धनगरवाड्यावर अशोक मरगळे,अंकुश मरगळे यांच्या घरांचे नुकसान तर माणगांव येथे अनिल जगताप यांच्या घरावर झाडे पडुन सर्वं घर मोडले आहे. सर्व जण घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.तसेच टेकपोळे येथील धनगर वस्त्यावर बाळू हिरवे, गंगाराम ढेबे,बाबूराव ढेबे,धोंडीबा ढेबे, महादू ढेबे, सिताबाई ढेबे, रामभाऊ ढेबे आदींच्या घरांची छपरे उडाल्याने यांचा संसार उघड्यावर येवून बेघर होण्याची वेळ आली. घोल,गारजाई येथील सिताबाई पोळेकर व अन्य ७ जण किरकोळ जखमी झाले. दिवसभर मुसळधार पावसासह तिव्र वेगाचे वादळवारे रात्री उशीरा शांत झाले. संपुर्ण तालुक्याला चक्री वादळ पावसाने झोडपून झाल्यानंतर कहर माजवलेल्या वादळाच्या शांततेनंतरचे चित्र मन हेलावून टाकणारे होते.







