मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून देखील राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली होती. ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या या नव्या नियमावलीमध्ये महाराष्ट्रात नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ धोरणाबाबत काही सुधारणा जाहीर केल्या आहेत.

राज्य सरकारने 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. आज जाहीर करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये याआधी जाहीर करण्यात आलेली कोणतीही गोष्ट वगळण्यात आली नसली तरी त्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
‘मिशन बिगीन अगेन’च्या 3 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये उद्यानात जाण्यास, जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली होती. या परवानग्या अबाधित राहणार असल्या तरी उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याची अथवा व्यायाम करण्याची उपकरणे वापरता येणार नसल्याचं सुधारित नियमावलीमध्ये सांगण्यात आलंय. या ठिकाणी कोणतीही ग्रुप ऍक्टिव्हिटी करण्यास, खुल्या मैदानात गर्दी करण्यास याआधीच मनाई करण्यात आली होती.

‘मिशन बिगीन अगेन’च्या 5 जूनपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये याआधी राज्यातील सर्व मार्केट्स आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुधारित नियमांनुसार आता एका दिवशी रस्त्याच्या एका बाजुचीच दुकाने उघडता येणार आहेत. दुकानात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची जबाबदारी दुकानदारावर निश्चित करण्यात आली असून नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व पोलीस कमिशनर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याआधी जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्यास मुभा असेल. तसेच मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बंदी देखील कायम राहील.
‘मिशन बिगीन अगेन’च्या 8 जूनपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 8 जूनपासून काही प्रमाणात खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. तसेच खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती लावता येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. अद्यावत नियमांनुसार आता खाजगी कार्यालयांमध्ये १० टक्के अथवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल ते) काम करू शकतील. इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे, कार्यालयात सॅनिटायझेशन करावे या सूचना देण्यात आल्या आहेत. याखेरीज तिसऱ्या टप्प्यामध्ये वृत्तपत्रांचे घरोघरी वाटप करण्यास देखील मुभा देण्यात आली आहे.







