भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी भागातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील नॉर्थ कॉलनी भागात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चेतन चंद्रमणी शिंदे (वय २५) हे शहरातील नॉर्थ कॉलनी भागात आई-वडील बहिणीसह राहतात. ते संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून सेवारत आहेत. ते व त्यांचे वडील चंद्रमणी शिंदे कामावर गेले असताना, त्यांची आई व लहान बहीण नेहा या नियमित तपासणीसाठी रेल्वे हॉस्पिटलला गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या दुपारी १२ वाजता घराबाहेर पडल्या. दरम्यान, दुपारी दीडला परत आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर बेडरूम व किचनमधील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले आढळले.
कपाटातील लॉकरमधून ३ तोळे वजनाची काळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ७५ हजार रुपये, १ तोळ्याचा डिझाईनयुक्त सोन्याचा नेकलेस किंमत २५ हजार रुपये, १ तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके किंमत २५ हजार रुपये, ५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स किंमत १२ हजार ५०० रुपये, ४ ग्रॅमची काळ्या मण्यांची पोत किंमत १० हजार रुपये, अर्धा किलो वजनाचे चांदीचे कडे-पाटले किंमत ४० हजार रुपये याप्रमाणे दागिने चोरीस गेले आहेत. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ८७ हजार ५०० रुपये आहे. घटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे घरी आले व त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.