पुणे (वृत्तसंस्था) – दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण करून डॉक्टरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार भेकराईनगर हडपसर येथील हरपळे क्लिनिकमध्ये घडला. या डॉक्टरकडून आरोपींनी सात लाख रुपयांची रक्कमही उकळली. गर्भलिंग निदाण चाचणी केली नसतानाही ती केल्याचे धमकावत ब्लॅकमेलिंग करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, आरोपींमध्ये एक स्वयंघोषित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन महिला, प्रदीप फासगे (37, रा. प्रिझम सोसायटी, मांजरी), कैलास अवचिते (38, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर), समीर थोरात (रा. हडपसर) आणि अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय 48, रा. चंद्रपार्क, श्रद्धानगर कोंढवा, मूळ-फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि.29 ते 31मे या कालावधीत घडला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली. हडपसर पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर शिंदे हे स्त्री रोगतज्ज्ञ आहेत. ते मागील तीन वर्षांपासून ते येथील एका खासगी दवाखान्यात प्रॅक्टिस करतात. एका महिलेने त्यांच्याशी मोबाइलवर वारंवार संपर्क साधून ‘वैद्यकीय तपासणीचे काम आहे,’ असे सांगितले. यासाठी त्यांची खडी मशीन चौकात एकदा भेटदेखील झाली. ही महिला रविवारी तपासणीसाठी रुग्णालयात आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना ‘मला मुलगा हवा असून, माझी गर्भलिंगनिदान चाचणी करा’ असे सांगितले.
त्यावेळी शिंदे म्हणाले, ‘तुम्ही गर्भवती नसतानाही चाचणी करा, असे कसे म्हणता?’ महिलेला समजावत असतानाच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी महिलेच्या नवऱ्याने डॉक्टरांना केबिनध्ये येऊन पकडले. घाबरुन शिंदे याच्या तावडीतून सुटका करत केबिनबाहेर आले असता, रुग्णालयाचे मुख्य दार बंद होते. त्याचवेळी तिघा अज्ञात व्यक्तींनी रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी ‘तुम्ही डॉक्टर आहात. गर्भलिंगनिदान चाचणी कशी करता?’ असा जाब विचारला. त्यांनी ‘पोलिस आहोत’ असे सांगत डॉक्टरला धमकावले. ‘आमचे साहेब येईपर्यंत तुम्ही तुमच्या केबिनमध्ये गप बसा नाही, तर आरडाओरडा केला तर जीवे ठार मारेल’ अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे रुग्णालयाचे संचालक व फिर्यादी घाबरले होते.
दरम्यान, तपासणीसाठी आलेल्या महिलेने त्यांना ‘हे प्रकरण मिटवायचे असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी महिला, तिचा नवरा व इतर तिघांनी डॉ. शिंदे यांना जबरदस्ती एका चारचाकी गाडीत बसविले. यावेळी संबंधित संचालक देखील सोबत होते. त्यांना सासवड रोडलगतच्या एका कार्यालयात नेण्यात आले. बुलेटवरून आलेले तिघेजणदेखील यावेळी तेथे आले होते.